सांगली : रयत विकास आघाडीच्या चार जागा पदरात पाडून सांगली जिल्हा परिषदेत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच स्पर्धा रंगली आहे. भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी महाडिक गटाला गळ घातल्यानंतर, बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना आॅफर दिली. पतंगराव कदम आणि आघाडीचे नेते नानासाहेब महाडिक यांच्यात पेठ येथे प्रदीर्घ चर्चा झाली. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या खुर्चीचा खेळ चांगलाच रंगला आहे. मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. अमल महाडिक यांच्या माध्यमातून महाडिक गटाला आणि पर्यायाने रयत विकास आघाडीला गळ टाकला होता. रयत विकास आघाडी गळाला लागण्याची आशा भाजपच्या मनात फुलली असतानाच, बुधवारी काँग्रेसने रयत विकास आघाडीला सत्तेसाठी आॅफर दिली. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी रयत आघाडीचे नेते नानासाहेब महाडिक यांची पेठ येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होण्याची आॅफर दिली. भाजपच्या नादी न लागता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आल्यास आघाडीला फायदा होऊ शकतो, असे कदम यांनी सांगितले. या बैठकीत सत्तेतील पदांबाबतही चर्चा झाल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रदीर्घ चर्चेतून निर्णय झाला नाही. महाडिक यांनी अन्य नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. पतंगराव कदम यांच्यापाठोपाठ सत्यजित देशमुख यांनीही महाडिक गटातील नेत्यांशी चर्चा केली. सत्तेत रयत विकास आघाडीचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासनही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडीशी चर्चा केल्याचे समजताच, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही राहुल महाडिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही, काँग्रेसच्या भूलथापांना आघाडी नेत्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. बुधवारी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये रयत आघाडीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अर्थात यात अद्याप यश कोणाच्याही पदरात पडलेले नाही. त्यामुळे संघर्षाची ही कहाणी आता राज्यस्तरावरील नेत्यांपर्यंत रंगली आहे.कॉंग्रेसने यापूर्वी राष्ट्रवादीलाही आघाडीसाठी तयार केले आहे. दोन्ही कॉंग्रेसने एकत्र येण्याचे निश्चित केल्यानंतर रयत विकास आघाडीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. रयत आघाडीला खेचल्यानंतर त्यांचे काम आणखी सोपे होणार आहे. त्यामुळेच पतंगरावांनी पेठ येथे बुधवारी चर्चेसाठी तळ ठोकला होता. (प्रतिनिधी)महाडिक गट परतला...महाडिक गट मंगळवारी मुंबईत दाखल झाला होता. बुधवारी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे राहुल महाडिक, अमल महाडिक यांच्यासह अन्य कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात परतले. फडणवीस व महाडिक यांची पुन्हा भेट घालून देण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करीत आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आघाडीच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेसाठी छुप्या खेळ्या सुरू झाल्याने भाजपचे नेतेही सतर्क झाले आहेत.
काँग्रेस-भाजपमध्ये रयत आघाडीसाठी रस्सीखेच
By admin | Published: March 01, 2017 11:43 PM