काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत, सुजात आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:33 PM2023-09-27T15:33:35+5:302023-09-27T15:34:24+5:30
राज्यात, देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण तयार होण्यास भाजप जबाबदार
सांगली : वंचित बहुजन आघाडीने ‘इंडिया’ आघाडीत सहभागासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रस्ताव दिला होता. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत व नवे पक्ष जोडता येत नाहीत हे पुन्हा दिसून आले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. आम्हालाही त्यांचा पराभव करायचा आहे. त्यामुळेच आमच्या नेत्यांनी केंद्रातील व राज्यातील आघाडीत सहभागासाठी प्रस्ताव दिला आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर राज्यातील सर्व विधानसभा व लोकसभेच्या जागा आम्ही लढवू.
देशात भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मोडीत काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. दंगली घडवून मुस्लिमांबाबत द्वेषभावना पसरविली जात आहे. त्यांच्या सत्ताकाळात महिलांवरील राजकीय हल्ले, अत्याचार वाढले आहेत. विज्ञानाची, लोकशाहीची दडपशाही त्यांच्या काळात दिसत आहे.
दंगलीला भाजप जबाबदार
राज्यात, देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण तयार होण्यास भाजप जबाबदार आहे. दंगली घडवून मतांचे राजकारण ते करीत आहेत. त्यामुळे प्रार्थनास्थळांची सुरक्षा राज्याच्या पोलिसांकडून काढून घेऊन ती बीएसएफ किंवा एनएसडीकडे द्यावी, अशी आमची मागणी आहे.