अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शिराळ्यात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस जिवंत ठेवली आहे, तर वाळवा तालुक्यात सत्तेसाठी काँग्रेस, अन्यथा आम्ही त्या पक्षाचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र आगामी निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रत्ययही नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी आला.शिराळा मतदारसंघात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक एकत्र असताना राष्ट्रवादीची डाळ शिजली नाही. परंतु यांच्यामध्ये फूट पडल्याने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत मानसिंगराव नाईक आमदार झाले, तर नंतरच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवाजीराव नाईक आमदार झाले. यामुळे दहा वर्षापासून शिराळ्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. आता सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळते-जुळते घेतले आहे.वाळवा तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे नानासाहेब महाडिक यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे काही काँग्रेस नेते त्यांच्यापासून लांब राहणे पसंत करतात. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडून पक्षवाढीसाठी निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते दुरावले आहेत. बोरगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील यांनी परिसरापुरती काँग्रेस जिवंत ठेवली आहे. परंतु ही ताकद तालुक्यात चालत नाही. दादासाहेब पाटील, प्रतापराव मोरे, आर. आर. पाटील, नजीर वलांडकर, जयकर कदम नावालाच पक्षात आहेत.इस्लामपूरचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार काँग्रेसमध्ये असले तरी, अस्तित्व टिकवण्यासाठी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संधान साधून आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील शांत असून, त्यांचे चिरंजीव जयराज पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सत्यजित देशमुख यांचे नेतृत्व मानून युवा काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.वाळवा तालुक्यात काँग्रेस पक्ष एक असला तरी, नेते मात्र अनेक झाले आहेत. त्यामुळे पक्षाची वाताहत होत चालली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पडलेले गट एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. कार्यकारिणी बदलाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. आगामी काळात युवकांना संधी देऊ.- बाळासाहेब पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष, काँग्रेस.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत
By admin | Published: January 23, 2016 1:14 AM