लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन नको, जगणं सोपं करा, अशी मागणी करीत काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने केली. काँग्रेस राज्यातील सत्तास्थानी असून त्यांच्याच सरकारने निर्णय घेतला असतानाही त्याविरोधात भोसले यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांचे आंदोलन राजकीय पटलावर चर्चेत आले आहे.
स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. नगरसेवक भोसले म्हणाले, लॉकडाऊनमुळे कष्टकरी कामगार वर्ग, हातगाडीवाले, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, छोटे-छोटे कारखानदार, इतर छोटे व्यावसायिक आणि व्यापारी या सर्वांनाच जगण्यासाठी मारामार करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनासाठी केवळ आणि केवळ लॉकडाऊन हा उपाय नव्हे. आरोग्य व्यवस्था सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक बेड आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे यावर भर द्यायला हवा.
कोरोनावरील उपचार करताना शासनाने जास्तीत जास्त हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत, सर्व हॉस्पिटलला महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा, रुग्णांना संपूर्णपणे मोफत उपचार देण्यात यावेत. लॉकडाऊन करावे लागल्यास नागरिकांच्या दैनंदिन गरजा, रोजच्या जगण्यातील संपूर्ण गरजेच्या वस्तू रेशनिंग, वीज बिल, शासकीय कर, कर्ज, कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज, संपूर्ण औषधोपचार संपूर्ण शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.