सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध
By शीतल पाटील | Published: May 3, 2023 07:05 PM2023-05-03T19:05:49+5:302023-05-03T19:10:43+5:30
स्थायी समितीकडून महासभेकडे अर्थसंकल्प सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींकडून अद्याप यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात न आल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. नागरिकांना विकासापासून रोखण्यासाठीच भाजपने अंदाजपत्रक लांबणीवर टाकल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी केला.
दरम्यान काँग्रेसचे आंदोलन सुरू असतानाच स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी अंदाजपत्रकासाठी १९ मे रोजी महासभा घेण्याचे पत्र महापौरांना दिले. हा वेळकाढूपणा असल्याच्या सांगत कांग्रेस नगरसेवकांनी सभापती सूर्यवंशी यांचा निषेध केला.
महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर होणे गरजेचे होते, पण स्थायी समितीकडून महासभेकडे अर्थसंकल्प सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी कांग्रेस गटनेते मेंढे यांनी केला होता. सभापती सूर्यवंशीनी पंधरा दिवसात अर्थसंकल्प सादर करू अशी ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात मे महिना उजाडला तरीही अर्थसंकल्पाबाबत काहीच हालचाली दिसून न आल्याने नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
यावेळी सभापती धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजपचा निषेध केला. गटनेते संजय मेंढे, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक मनोज सरगर, उत्तम साखळकर, संतोष पाटील, अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, अमर निंबाळकर, महेश साळुंखे, नगरसेविका रोहिणी पाटील, बबिता मेंढे, शुभांगी साळुंखे उपस्थित होत्या.