अशोक पाटील -- इस्लामपूर -राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या वाळवा तालुक्यात काँग्रेसची अवस्था बिनबुडाच्या घागरीसारखी आहे. मात्र आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा त्यांच्याकडून सुरू आहे. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे येथील विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना डावलून ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे जितेंद्र पाटील यांनीही स्वतंत्रपणे ठाकरे यांची भेट घेऊन भूमिका मांडली. सत्कारही झाले. यामुळे पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आली.वाळवा तालुक्यात कधी वसंतदादा घराणे, तर कधी माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांच्या ताकदीवर काँग्रेसचा गाडा हाकण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, वैभव पवार, विजय पवार, आनंदराव पाटील यांचा समावेश आहे. हे नेते काँग्रेसचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्याचा आव आणत असतात. त्यामुळे तुरळक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी टॉनिक पाजावे लागते. तरीही काँग्रेस अशक्तच आहे.माणिकराव ठाकरे आल्यानंतर बाळासाहेब पाटील हे विजय पवार, आनंदराव पाटील, जयकर कदम, दादासाहेब पाटील, शशिकांत लोहार, प्रकाश पोरवाल, हणमंत जाधव, शिवाजी मस्कर, बाळासाहेब पवार, तौफीक मुजावर, किसन पाटील यांच्यासमवेत ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. ही माहिती समजताच जितेंद्र पाटील यांनीही कार्यकर्त्यांसमवेत ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आर. आर. पाटील, जयकर कदम, दादासाहेब पाटील, विशाल शिंदे, दीपक लकेसर, अर्जुन खरात, भाऊ पाटील होते. यामुळे पक्षातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर आली.तालुकाध्यक्ष या नात्याने बाळासाहेब पाटील यांनी माणिकराव ठाकरे यांच्या दौऱ्याची कोणतीही कल्पना दिली नाही. कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांचे प्रयत्न तोकडे आहेत.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य.माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील वाळवा तालुक्यात काँग्रेसचे, तर कऱ्हाड तालुक्यात भाजपचे नेतृत्व मानतात. यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दुरावलो आहोत.- विजय पवार, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.
माणिकराव ठाकरेंसमोर काँग्रेसची दुफळी चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 11:31 PM