सांगली : केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात गुरुवारी शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करताना, वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन काँग्रेसने भाजपच्या ‘अच्छे दिन’ची आठवण करून दिली.केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांनी झालेल्या वाढीच्या विरोधात हे आंदोलन केले.
आंदोलनावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आरूढ झालेल्या केंद्र सरकारने मागील पाच वर्षात सातत्याने इंधन दरवाढ केलेली आहे. त्याचा थेट परिणाम बेरोजगारी आणि देशाच्या विकास दरावर झाला होता. दुसºयांदा निवडून येताच वाढलेल्या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, तरुण तसेच उद्योगधंद्यांना होत आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४ हजार १५३ असा कमी असताना केंद्र सरकारचे कर आणि राज्य सरकारचे कर एकत्र करून देशात सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रातील जनतेला विकले जात आहे. हा भेदभाव असण्याचे कारण काय? या जादा करामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घरातील बजेटवर मोठा परिणाम होत आहे. यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक संतोष पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे, अजित ढोले, सदाशिव वाघमारे, रफीफ मुजावर, बिपीन कदम, सनी धोतरे, आयुब निशाणदार, पैगंबर शेख, विजय जाधव, माणिक कोलप, अरुण धोतरे, अशोक रजपूत, बापगोंडा पाटील आदी उपस्थित होते.