सुनील तुपे ल्ल किर्लोस्करवाडी :पलूस तालुक्यात भाजपचे कमळ प्रथमच फुलले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या चार जागा मिळवत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पलूस पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणली आहे. हा निकाल काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, डॉ. विश्वजित कदम यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.वीस वर्षे मंत्री असणाऱ्या डॉ. कदम यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी मतदार संघात काम करत आहे. भारती उद्योग समूहाचा सेवकवर्ग काम करत होता. तरीही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले आहे. डॉ. कदम यांनी पलूस तालुक्याला कोणत्याच पध्दतीचा निधी कमी पडू दिला नाही. गावा-गावात विकास कामांचा डोंगर उभा केला. मात्र मतदारांनी काँग्रेसला नाकारले, याचे मोठे कारण म्हणजे तालुक्यात असणारे गटा-तटाचे राजकारण. तालुक्यात प्रत्येक गावात कदम यांचे दोन किंवा तीन गट आहेत. प्रत्येक गट स्वत:ला मोठा समजतो. एकमेकाची जिरविण्याच्या नादात काँग्रेसला सर्व जागा घालवाव्या लागल्या आहेत. याउलट भाजपच्या सर्व कार्यक र्त्यांनी एकसंध होऊन काम केले. भाजपने युवक वर्गाला मोहात पाडून युवकवर्ग भाजपकडे आकर्षित केला. नेहमी पाठीशी असणाऱ्या पलूस तालुक्यातील मतदारांना काँग्रेसने गृहित धरले, त्याचा परिणाम भोगावा लागला. मतदार जागरूक झाला आहे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. गावा-गावातील काँग्रेस नेत्यांची गटबाजी संपुष्टात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदारांनी पंचायत समितीची किल्ली भाजपकडे सोपवली. गटा-तटाच्या राजकारणात काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले. नोटाबंदीचा कोणताही परिणाम पलूस तालुक्यात जाणवला नसून पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाने जि. प.च्या तीन व पंचायत समितीच्या चार जागांवर मजल मारली. काँग्रेसकडून पंचायत समितीच्या सत्ताकाळात गावपातळीवर काम केले गेले नाही. नागरिकांसाठी कोणताही ठोस कार्यक्रम आखला गेला नाही. तरूणांसाठी उपक्रम राबविला गेला नाही. नीटपणे शासकीय योजना आणल्या गेल्या नाहीत. नागरिकांच्या कामाचा निपटारासुध्दा झाला नाही. याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.
गटा-तटामुळे काँग्रेसला उतरती कळा
By admin | Published: March 02, 2017 11:51 PM