सांगली : राज्यातील सत्तानाट्यामुळे महापालिकेतील काँग्रेस खुश, राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:56 PM2022-06-25T13:56:38+5:302022-06-25T13:57:11+5:30
राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यात काँग्रेस नेतेही अयशस्वी ठरले होते. पण, आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले आहेत.
शीतल पाटील
सांगली : महापालिकेत आयुक्तांच्या दालनापासून ते महापौर कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढले होते. सत्ताबाह्य केंद्रांनी ही कार्यालये जणूकाही ताब्यातच घेतली होती. त्यामुळे विरोधी भाजपसह सहकारी काँग्रेसचे नगरसेवकही दुखावले गेले होते. राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यात काँग्रेस नेतेही अयशस्वी ठरले होते. पण, आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले आहेत. महापालिकेतील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत निघून किमान नगरसेवकांना मानसन्मान तरी मिळेल, अशी अपेक्षा सदस्यांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ४३, काँग्रेसला २०, तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. दरम्यानच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. पालकमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आली. त्यामुळे महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीने पाय पसरण्यास सुरुवात केली.
महापालिकेतील सर्वात लहान पक्ष असतानाही राज्यातील सत्तेचा लाभ उठवित सहकारी काँग्रेस व विरोधी भाजपच्या खच्चीकरणाचे काम सुरू आहे. पहिल्या अडीच वर्षानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्यात आला. त्याला काँग्रेसची साथ होतीच. पण, महापालिकेतील सत्तांतरानंतर काँग्रेसची अवस्था दयनीय झाली होती.
केवळ नावालाच सहकारी पक्ष उरला होता. महापालिकेच्या कारभारात कुठेच काँग्रेसला विश्वासात घेतले जात नव्हते. महापौरांसह सत्ताबाह्य केंद्रांनी महापालिकाच ताब्यात घेतली होती. याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण नेत्यांनीही तोंडाला पाने पुसण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसने भाजपच्या साथीने राष्ट्रवादीला विरोध करण्यास सुरूवात केली होती.
आयुक्तांच्या दालनापासून ते महापौरांच्या कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. तासनतास राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महापौर, गटनेते आयुक्तांच्या कार्यालयात ठाण मांडून असत. त्यामुळे इतर नगरसेवकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. सभेत अनेक विषय घुसडले जात होते. वादग्रस्त विषयांवर कसलीच चर्चा न करता निर्णय होत होते. त्यातून काँग्रेसचीच अधिक बदनामी होऊ लागली होती. आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाले आहे.
तेव्हापासून काँग्रेसचे नगरसेवक भलतेच खूश झाले आहेत. सत्तांतरानंतर राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होईल, त्यातून किमान नगरसेवकांचा हरवलेला सन्मान पुन्हा प्राप्त होईल, अशी आशा काँग्रेस सदस्यांना लागली आहे.राज्यातील सत्तानाट्यामुळे महापालिकेतील काँग्रेस खूश
पंधराचे पाच नगरसेवक होतील...
राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल स्वपक्षातील बरेच नगरसेवकही नाराज होते; पण जाहीर वाच्यता केली जात नव्हती. अखेर गत महासभेत योगेंद्र थोरात यांनी असंतोषाला वाट करून दिली. राष्ट्रवादीचा हाच कारभार पुढे सुरू राहिल्यास महापालिकेच्या निवडणुकीत १५ नगरसेवकांचे पाच नगरसेवक होतील, असा इशाराही दिला; पण त्यांच्या वक्तव्याची महापौरांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नगरसेवकांनी दखल घेतली नाही; पण राज्यात सत्तांतराचे संकेत मिळू लागताच थोरात यांची भीती खरी ठरते की काय? अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.