सांगली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वाटेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षअशोक चव्हाण यांनी रविवारी येथे केली. जनसंघर्ष यात्रेनिमित्त सांगलीत आलेल्या काँग्रेस नेत्यांनी रविवारी सकाळी येथील वसंतदादांच्या स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांचे विचार नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारे ठरले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत लोकांसाठी कार्यरत राहण्याची त्यांची कार्यपद्धती स्फुर्तीदायी आहे.
त्यामुळे आम्ही काँग्रेसजन आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी याठिकाणी आलो आहोत. संपूर्ण राज्यातील जनता कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला प्रतिसाद देत आहे. सांगली जिल्ह्यातही वसंतदादांवर व त्यांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे येथील जनताही आमच्या पाठीशी राहिल, याचा विश्वास आहे. भाजपा सरकार वाटेल त्या गोष्टी सत्तेसाठी करीत आहे. सत्ता उपभोगताना त्यांनी कधीही जनतेच्या हितासाठी काम केले नाही. राज्यातील व देशातील जनता अनेक प्रश्नांना सामोरी जात आहे. असेच चालत राहिले तर सामान्य माणसाचे जगणे मुश्किल होईल. त्यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणांची चर्चा करतानाच लोकांशी संवाद साधण्याचे काम आम्ही या यात्रेच्या निमित्ताने करीत आहोत. त्यास प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेविषयी चिंतन करूसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील पराभव हा फार मोठा विषय नाही. आम्ही केवळ काठावर पराभूत झालो आहोत. तरीही या पराभव नेमका कशामुळे झाला, याचे चिंतन करू. या निवडणुकीतून बरेच शिकण्यासारखे आहे, असे चव्हाण म्हणाले.