Sangli: मिरजेत काँग्रेसला धक्का, सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:23 PM2023-11-29T16:23:50+5:302023-11-29T16:24:13+5:30
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने केला दावा
मिरज : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्याने मिरजेतील काँग्रेस नेते व मागासवर्गीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी काँग्रेसला रामराम करून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाआघाडीतर्फे तूल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचे ठाकरे गटाचे धोरण आहे. मिरजेच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केल्याने ही जागा शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेने विधानसभा उमेदवारीसाठी महाआघाडीतील अन्य काही इच्छुक मंडळीही शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते इच्छुक असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेत भाजपविरोधात आणखी मजबूत उमेदवाराच्या शोधात आहेत. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची इच्छुक मंडळी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने मिरजेतील काँग्रेस नेते सिद्धार्थ जाधव यांनीही शिवसेना प्रवेश केला आहे.
मिरजेतून २०१४मध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून सिद्धार्थ जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. सोमवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ जाधव यांना शिवबंधन बांधले. यावेळी खा. विनायक राऊत, खा. संजय राऊत, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, अभिजित पाटील उपस्थित होते.