सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी वांगी (ता. कडेगाव) येथे शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र तसेच देशातील काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्ते, समर्थक आणि सोनहिरा खोऱ्यातील लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यात आला.
मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री पतंगरावांचे निधन झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी पुणे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता सोनसळ येथे त्यांच्या जन्मगावी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. यावेळीही या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वांगी येथे सोनहिरा साखर कारखाना ते कडेगाव रस्त्यावरील अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता पतंगरावांचे पुत्र विश्वजित कदम यांनी मुखाग्नी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपपसभापती माणिकराव ठाकरे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, विजयसिंह मोहिते पाटील, खा. संजयकाका पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, शेकापचे आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रा. एन. डी. पाटील, विनय कोरे, पतंगरावांचे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती होती.