विटा : आताच्या राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने सरकारचे घोडे मारलेय काय, असा संतप्त सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सध्या पक्षांतर केल्यामुळे यापूर्वी आम्ही दिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विसर पडल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.विटा येथे जनसंवाद पदयात्रेच्या कार्यक्रमासाठी आलेले माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आताचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेत असल्याकडेही लक्ष वेधले.चव्हाण म्हणाले, ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्रे, दाखले पुरावे आहेत. त्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब लोक ज्यांना राहायला घर नाही, ते पुरावा कुठे सांभाळत बसणार आहेत. मात्र, अशा पद्धतीने आता मराठवाड्यातील मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केले आहेत.आज सरकार निजामकालीन कागदपत्रे, पुरावे दाखले ग्राह्य धरत आहे; पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही. हा कोणता न्याय आहे असे म्हणत आता दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
अजित पवारांना विसर...कोल्हापूर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हेदेखील दिल्लीतूनच आले. मग त्यांनी का आरक्षण दिले नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर केली होती. त्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यावेळी माझ्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. ते आज माझ्यावर टीका करीत आहेत. कारण त्यांनी आता पक्षांतर केल्यामुळे त्यांना आम्ही दिलेल्या आरक्षणाचा विसर पडला आहे. अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार यांच्यावर केली.