सांगली : शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिल्या यादीत सांगलीसाठीचंद्रहार पाटील यांची उमेदवारी बुधवारी सकाळी जाहीर झाली. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते नाराज झाले असून, त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली आहे. अन्यथा बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेने (उबाठा) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर दावा केला. त्याला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. तरीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बुधवारी पहिल्या यादीत चंद्रहार यांच्या उमेदवारीचा समावेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी बुधवारी दिल्ली गाठली.
डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वणुगोपाल, मुकुल वासनिक व सलमान खुर्शीद यांची भेट घेतली. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, त्याचा हक्क आम्ही सोडणार नसल्याची आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना सांगलीची जागा सोडणार नसेल, तर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना पक्षाच्या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सांगलीवरून आघाडीत बिघाडी?महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर चर्चा आहे. असे असताना शिवसेनेने परस्पर यादी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतेय.