अशोक पाटील --इस्लामपूर --आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघातील नेत्यांना जाग आली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी निवडणुका स्वबळावर लढविण्याची भाषा सुरू केल्यानंतर येथील काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. साखराळे येथील वाड्यात बसून तालुक्याची काँग्रेस चालविणारे बाळासाहेब पाटील यांनी बैठकीचे फर्मान काढले आहे. ही बैठक शनिवारी, २५ रोजी इस्लामपूर येथे होत आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी वर्षानुवर्षे अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवले आहे. त्यांनी तालुक्यातील काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना यश आले नाही. बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी आता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी, तालुक्यात काम करताना काँग्रेस आणि कृष्णा कारखान्यावर संचालकपद भूषविताना भोसले गटाच्या नेतृत्वाखाली भाजपशी संधान साधले आहे.इस्लामपूर शहरात वैभव पवार आणि विजय पवार हे दोन बंधू काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. वैभव पवार काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर विजय पवार यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. परंतु काँग्रेसमध्ये एकी नसल्याने काँग्रेसच्या विरोधाला राष्ट्रवादी जुमानत नाही.वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांच्या नावाचा दबदबा होता. परंत पाच वर्षांपासून महाडिक यांनी काँग्रेसशी काडीमोड घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीचा आधार घेतला होता. आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी मिळतेजुळते घेतले आहे. सध्या तालुक्यातील काही काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत. महाडिक यांचे कट्टर समर्थक व वाळव्याचे नजीर वलांडकर यांच्यावर महाडिक गटाचा शिक्का असला तरी, सध्या ते युवा नेते, सरपंच गौरव नायकवडी यांच्यासमवेत आहेत.कामेरीचे सी. बी. पाटील, त्यांचे सुपुत्र जयराज पाटीले आमदार शिवाजीराव नाईक यांचे नेतृत्व मानणारे होते. परंतु आ. नाईक यांनी विकास आघाडीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पाटील पित्रा-पुत्र त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी आता माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांचे नेतृत्व मान्य करुन काँग्रेसमध्ये काम सुरू ठेवले आहे.तालुक्यातील अनेक चेहरे काँग्रेसमध्ये आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उठावदार कार्य दिसून आलेले नाही. त्यांचा पक्षालाही काहीही फायदा झालेला नाही. असे चेहरे काय कामाचे, असाही सवाल उपस्थित होतो. आता अशा सर्वांची बैठक शनिवार, दि. २५ रोजी वाळवा तालुका काँग्रेस कमिटीत होणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सत्यजित देशमुख, श्रीमती शैलजा पाटील, पृथ्वीराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा तालुक्यातील कोमात गेलेल्या काँग्रेसला कितपत फायदा होणार, हे लवकरच दिसून येणार आहे.युवकांच्या प्रश्नांकडे : युवा नेत्यांचे दुर्लक्षकाँग्रेस पक्षामध्ये युवा नेत्यांची मोठी फौज आहे. प्रत्येकाकडे काही संस्थांची पदेही आहेत. परंतु, या युवा नेत्यांचे सूर जुळत नाहीत. यामुळे महाविद्यालयीन युवक, युवा नोकरदारांवर झालेल्या अन्यायाच्या प्रश्नावर काँग्रेसची युवा फौज रस्त्यावर उतरताना दिसत नाही. युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न कधी कळणार, असा सवालही युवकांमधूनच उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांसमोर वीज प्रश्न, उपसा बंदी आदीचे प्रश्न आहेत. महागाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. तरीही या प्रश्नावर केंद्रात आणि महाराष्ट्रात विरोधात असतानाही काँग्रेसच्या युवा नेत्यांनी आंदोलनाचा आवाज उठविला नाही.
इस्लामपूरच्या काँग्रेस नेत्यांना आली जाग
By admin | Published: June 21, 2016 12:20 AM