अशोक डोंबाळेसांगली : कदम-दादा गटाच्या विरोधातील राजकारणाला मूठमाती देत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी नव्या राजकारणाला सुरुवात केली. तरुणांच्या भूमिकेवर मतदारांनी विश्वास ठेवत विशालला विजयी केले. पडद्यामागून सूत्रे हालवून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बळ विशालच्या पाठीमागे उभा करण्यातही विश्वजित कदम यशस्वी झाले.सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, भाजपने २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा काँग्रेससह राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागली होती. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार व्हावा लागले होते. राजकारणातील या तोट्याचा विचार करूनच काँग्रेसमधील तरुण पिढीने गटा-तटाच्या राजकारणाला फाटा देत एकसंधपणे काम करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कृतीतून दाखवून दिले.
काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल यांच्या बंडखोरीला मदत केली. सांगलीचे वाघ आम्हीच आहोत, हेही दाखवून दिले. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धवसेनेची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली. म्हणून त्यांनी सांगली लोकसभेवर दावा सांगितला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यावरून काँग्रेस-उद्धवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जागा झाला. वसंतदादाप्रेमी गटाला पुन्हा ऊर्जितावस्था आली.काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनेही विशाल पाटील यांच्यावर कारवाईची गडबड केली नाही. प्रथमच काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी संयम दाखविला. या सर्व गोष्टींचा विशाल पाटील यांच्या विजयासाठी फायदा झाला. काँग्रेसच्या प्रदेश आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना सांभाळण्यापासून ते सांगली लोकसभेतील प्रचाराची सूत्रे हालविण्यात डॉ. विश्वजित कदम यांचा मोलाचा वाटा होता.
आम्हीच सांगलीचे वाघ ..महाविकास आघाडीत शिवसेनेला नाराज न करता काही सभांमध्ये डॉ. विश्वजित कदम सहभागी झाले. मात्र मनापासून ते सोबत नव्हते. काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांनी अंतर्गत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सर्व रसद विशाल पाटील यांनाच दिली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेतही विश्वजित कदम यांनी शिवसेनेचे तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात. मात्र सांगलीचे वाघ आम्हीच आहोत, हे जाहीरपणे सांगितले. त्याप्रमाणे विश्वजित कदम यांनीही सांगलीचे वाघ आहे, हे सिद्ध करून दाखविले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची एकत्रित मोट बांधून ‘विशाल’चा विजय खेचून आणण्यात डॉ. विश्वजित कदम यशस्वी झाले.
घोरपडे, जगताप यांच्याकडून करेक्ट कार्यक्रमभाजपचे खासदार संजय पाटील यांच्याविरोधात उघड भूमिका घेऊन कवठेमहांकाळचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला. या दोन नेत्यांनी जिल्ह्याचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या नेत्याचाच करेक्टर कार्यक्रम केल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.