सांगली : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकजूट राहून ‘करून दाखविले’, असे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत आमचा विजय होईल, असा दावा आम्ही आधीच केला होता. त्यानुसार हे यश खेचून आणले आहे. या विजयासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन डावपेच आखले आणि ते यशस्वी केले.
सत्ताधारी भाजपचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. जेव्हा त्यांना या महापालिकेची सत्ता मिळाली तेव्हा त्यांनी राज्यभर त्याचा जल्लोष केला होता. त्यांना आकाश ठेंगणे झाले होते, परंतु त्यांच्या अडीच वर्षांच्या चुकीच्या कारभाराला कंटाळून त्यांच्याच नगरसेवकांनी बाहेर पडून त्यांना घरचा आहेर दिला आहे. ही त्यांना मोठी चपराकही आहे. भाजपचे नेतृत्व करणारी नेतेमंडळी यांचेही महापालिकेच्या कारभाराकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यांच्या कारभाराला शहरातील नागरिकही कंटाळले होते.
यापुढच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत, असेही ते म्हणाले.