सांगलीत आघाडीचा सूर जुळता जुळेना... : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस-महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:44 PM2018-07-09T23:44:03+5:302018-07-09T23:44:55+5:30

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असताना, राजकीय पक्षांच्या आघाडीवर धावपळ सुरू आहे.

Congress-NCP in ruckus-municipal elections | सांगलीत आघाडीचा सूर जुळता जुळेना... : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस-महापालिका निवडणूक

सांगलीत आघाडीचा सूर जुळता जुळेना... : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस-महापालिका निवडणूक

Next

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असताना, राजकीय पक्षांच्या आघाडीवर धावपळ सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडीवरून पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला ३० पेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिला आहे, तर राष्ट्रवादीने ३३ ते ३५ जागांची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत जागा वाटपावरून आघाडीचा सूर जुळलेला नव्हता.

काँग्रेसच्या उमेदवारीबाबत सकाळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर गोपनीय बैठक सुरू होती. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, माजी महापौर किशोर शहा उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी आमदार विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत ‘विजय’ बंगल्यावर बैठक झाली. काँग्रेसने आघाडी व स्वतंत्र अशा दोन याद्या तयार केल्या आहेत. आघाडी न झाल्यास स्वबळावर ७८ जागा लढविण्याची तयारीही केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी दुपारी सांगलीत दाखल झाले. त्यानंतर रतनशीनगर येथील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या बंगल्यात त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. अनेक इच्छुकांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीचे साकडे घातले. त्यानंतर जयंत पाटील यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत गोपनीय बैठक घेतली. यात उमेदवार यादी, तसेच आघाडीच्या समीकरणावर चर्चा झाल्याचे समजते.

दोन्ही पक्षांकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांत जागा वाटपावरून बैठकांवर बैठका सुरू होत्या. राष्ट्रवादीकडून ४३-३३ चा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. त्यात दोन जागा जनता दलालाही सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. पण काँग्रेसचे नेते ३० पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीत. एखादी जागा वाढवून देऊ, पण ३३ ते ३५ जागा राष्ट्रवादीला देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीचे घोडे जागा वाटपावर अडले आहे.जागावाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची निश्चिती केली जाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले.
 

संख्येवर अडले घोडे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा दोन महिन्यापासून सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना प्रस्तावही देण्यात आले. हे प्रस्ताव नंतर फेटाळलेही गेले. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा अवधी उरला असतानाही, आघाडीचे घोडे संख्येवर येऊन अडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने किती जागा लढवायच्या, यावरून खल रंगला आहे. काँग्रेस ३० पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादी किमान ३५ जागांची मागणी करीत आहे. सोमवारी रात्री पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. पण त्यातही तोडगा निघाला नाही.
इद्रिस नायकवडींची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या बंगल्यावर बैठक सुरू होती. या बैठकीत माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनीही भाग घेतला होता. त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन मिरजेतील जागा वाटपाबाबत चर्चा केल्याचे समजते. याशिवाय राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांसह दिग्गज इच्छुकांनीही यावेळी जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीचे साकडे घातले.

Web Title: Congress-NCP in ruckus-municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.