सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून अन्य सर्व संघटना व पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रच असून ते आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, शिवसेना पक्षाला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आमच्याकडे ३४ संख्याबळ असल्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेला धरून अथवा वगळून सत्ता स्थापण्यासंदर्भात आम्ही कोणतेही विधान केले नसताना, भाजप नेत्यांनी शिवसेनेशिवाय सत्तेचा केलेला दावा आश्चर्यकारक आणि व्यथित करणारा असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर आहेतच. याशिवाय, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्षांसह भाजपकडे जिल्हा परिषदेत ३४ सदस्यसंख्या असल्याचे मी सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आमचे विरोधक आहेत. या दोन पक्षांना जनता कंटाळल्यामुळेच मतदारांनी भाजपला स्वीकारले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २५ सदस्यसंख्या असल्यामुळे सत्ता आम्हीच स्थापन करणार आहोत. मित्रपक्षही आमच्याबरोबर असणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘रयत’चा पाठिंबा रयत विकास आघाडीचे चार जि. प. सदस्य आहेत. यापैकी दोन नानासाहेब महाडिक गटाचे, तर कामेरीची जागा काँग्रेसचे नेते सी. बी. पाटील गटाची असल्याचे बोलले जात आहे. वाळवा गटातील डॉ. सुषमा नायकवडी क्रांती आघाडीच्या आहेत. महाडिक गट १४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा, हे त्यांचे निश्चित होणार आहे. कामेरी आणि वाळवा गटातील सदस्यांच्या पाठिंब्याचा घोळ कायम असून, योग्यवेळी तो जाहीर करू, असे वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून सगळ्यांचा पाठिंबा घेणार
By admin | Published: March 06, 2017 11:55 PM