सांगली : अखिल भारतीय कॉँग्रेस समितीकडून सोमवारी सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघासाठी मोहनराव कदम यांची उमेदवारी जाहीर झाली. कदम यांनी एबी फॉर्मसह आणखी एक अर्ज मंगळवारी दाखल केला. राष्ट्रवादीचे शेखर गोरे बुधवार, २ नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कॉँग्रेसअंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असताना, अधिकृत उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा काँग्रेसमधील नेते करीत होते. सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कदम यांना एबी फॉर्मही देण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह मोजक्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह कदम यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, आता आघाडीचा प्रश्नच उरलेला नाही. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार, हे स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षात आमचे मित्र असल्याने त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणतीही चिंता वाटत नाही. अधिकृत एबी फॉर्म मिळाला नसता तरीही निवडणूक लढविली नसती. पृथ्वीराज पाटील म्हणाले की, आघाडीची चर्चा किमान या मतदारसंघापुरती आता संपुष्टात आली आहे. कदम यांच्या प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. चांगला प्रतिसाद मतदारांमधून मिळत आहे. आमचे संख्याबळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी असले तरीही अन्य पक्ष व राष्ट्रवादीतील सदस्यही कदम यांच्या व्यक्तिमत्वामुळे आम्हाला पाठींबा देत आहेत. त्यामुळे विजयाची खात्री वाटते. (प्रतिनिधी) भाजपतर्फेही अर्ज राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत कमी संख्याबळ असतानाही भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपतर्फे नगरसेवक युवराज बावडेकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून, बुधवारी २ नोव्हेंबररोजी सकाळी साडेअकरा वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहे. आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार आहे. भाजपही रिंंगणात उतरत असल्याने बहुरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते येणार राष्ट्रवादीचे उमेदवारी शेखर गोरे यांचा अर्ज बुधवारी दाखल केला जाणार आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी कार्यालयातून प्रमुख नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी मंगळवारी दिली. नाराजांशी चर्चा काँग्रेसअंतर्गत ज्यांनी उमेदवारी मागितली होती, ते आता अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माघार घेतील. उमेदवारीची चर्चा सुरू असताना सर्वांनाच विश्वासात घेतले होते. पक्षांतर्गत नाराजी नाही. पुन्हा त्यांच्याशी चर्चा होणार आहे. काँग्रेस ही निवडणूक एकसंधपणे लढवेल, याची खात्री वाटते, असे मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.
कॉँग्रेसची उमेदवारी मोहनराव कदम यांनाच
By admin | Published: November 02, 2016 12:20 AM