सांगली : लोकसभेच्या सांगली मतदारसंघासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीनेइच्छुक म्हणून प्रतीक पाटील व पृथ्वीराज पाटील यांचीच नावे निश्चित केली आहेत. चर्चेत असलेल्या अन्य उमेदवारांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे दोनच नावे लिफाफ्यात बंद झाली आहेत.मुंबईत काँगे्रसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मंगळवारी (दि. २९) व बुधवारी (दि. ३0) होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील, पृथ्वीराज साठे, माजी मंत्री प्रतीक पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नामदेवराव मोहिते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी लोकसभेसाठी चर्चेत असलेल्या आ. विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील या तिन्ही नेत्यांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अंतिमत: प्रतीक पाटील व पृथ्वीराज पाटील यांचीच नावे इच्छुक म्हणून लिफाफ्यात बंद झाली आहेत. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा होऊन ही नावे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे जाणार आहेत. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील दोनच इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस दिसत आहे.प्रकाशबापू पाटील यांच्या पश्चात प्रतीक पाटील यांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गत लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. प्रतीक पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा दौरे सुरू केले असून, त्यांनी पुन्हा उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले पृथ्वीराज पाटील हेसुद्धा दावेदारी मजबूत करू पाहत आहेत. सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून पक्षीय अस्तित्व राखण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे पक्षामार्फत त्यांच्याही नावाचा विचार सुरू आहे. त्यामुळे दोन्ही इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून दोनच नावे;प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यात चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:26 AM