काँग्रेसला भाजपची नव्हे, स्वकीयांची चिंता -गटबाजीचीही मोठी परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:40 AM2019-03-19T00:40:49+5:302019-03-19T00:42:12+5:30
अविनाश कोळी । सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही ...
अविनाश कोळी ।
सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही हीच गटबाजी उफाळून आल्याने काँग्रेसला भाजपऐवजी स्वकीयांचीच चिंता अधिक सतावू लागली आहे. ही जागा आणि उमेदवारी कोणाला मिळणार, यावरच या गटबाजीच्या तीव्रतेचे प्रमाण अवलंबून राहणार आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीचा १९५२ पासूनचा इतिहास पाहिला, तर काँग्रेस याठिकाणी बहुतांशवेळा अपराजित राहिली आहे. तरीही गटबाजीचे काँग्रेसला लागलेले ग्रहण कधीही सुटलेले नाही. यापूर्वीचे हे ग्रहण खंडग्रास स्वरुपाचे होते, सद्यस्थितीत ते खग्रास स्वरुपाचे आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी अपयशाचा काळाकुट्ट अंधारच आला. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या अशा संस्थात्मक पडझडीचे दुखणेही काँग्रेसला त्यांच्याच गटबाजीमुळे सोसावे लागले. भाजपच्या गोटात या निवडणुका जिंकताना जितका आनंद व्यक्त होत होता, त्यापेक्षा अधिक आनंद स्वकीयांची जिरविल्याबद्दल काँग्रेसअंतर्गत अप्रत्यक्षपणे साजरा होत होता. गेल्या काही वर्षांतील काँग्रेसची वाताहत ही भाजपमुळे कमी आणि काँग्रेसच्या गटबाजीमुळेच अधिक झाल्याचे दिसून येते.
अपराजित राहण्याच्या बाबतीत महाराष्टÑात सर्वात अग्रेसर राहणारा हा मतदारसंघ मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून निघून गेला, असे सांगितले जात असले तरी, त्याला गटबाजीची लाटही तितकीच कारणीभूत ठरली आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजप व अन्य पक्षात का गेले, याचा विचार कधीही काँग्रेसमध्ये झाला नाही. जाणाऱ्यांना न अडविण्याची भूमिका आणि सामान्य कार्यकर्त्यांना त्याच त्या पदावर ठेवण्याच्या वृत्तीने काँग्रेसचे राजकीय मैदानी खेळातील डावपेच संपुष्टात आले.
स्वकीयांची कशी जिरवायची किंवा पुढे पळणाऱ्यांचे पाय कसे ओढायचे, याचा सराव मात्र येथील नेत्यांनी सातत्याने केला. त्याचा फायदा वैयक्तिक नावाचा डंका वाजविण्यासाठी झाला, मात्र पक्षाची यात मोठी वाताहत झाली. आता पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना, व्यक्तिगत ताकद कुचकामी ठरू लागली आहे.पक्षाच्या अस्तित्वावर स्वत:चे अस्तित्व अवलंबून असते, या गोष्टीचा विसर काँग्रेसमधील बहुतांश लोकांना पडल्यामुळेच, पक्षाचा आलेख प्रगतीऐवजी अधोगतीच्या दिशेने जात राहिला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आता पुन्हा हा आलेख उंचावण्यासाठी काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे ग्रहण संपुष्टात येणे आवश्यक आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही आता या गटबाजीसमोर हात टेकले असल्यामुळे, नेमके हे दुखणे बरे कसे होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वरिष्ठांच्या मनी साशंकतेचे ढग
स्थानिक पातळीवरचा गोंधळ, गेल्या काही निवडणुकांमधील पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण याचा अनुभव प्रदेश व केंद्रीय नेत्यांना असल्याने, त्यांच्या मनात अजूनही येथील एकजुटीबद्दल साशंकतेचे ढग दाटले आहेत. ही जागा काँग्रेसकडे राहिली किंवा स्वाभिमानी पक्षाला दिली तरी, नेत्यांचे सूर जुळतील याची खात्री कोणालाही वाटत नाही.
उद्ध्वस्त किल्ल्यासमोर ताकदीचे नाटक
विरोधकांनी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून त्याठिकाणचे सिंहासनही काबीज केले आहे. हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकवटण्याचे सूत्र स्वीकारण्याऐवजी, याच किल्ल्यासमोर व्यक्तिगत बाहुबलाचे प्रदर्शन करून वर्चस्वाचा नाट्यप्रयोग काँग्रेसने रंगविला आहे. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यानंतर, सक्षमतेचा ढोल वाजवित याच काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीचे नवे नाट्यही यात घुसडले.