..अन् थेट काँग्रेसचे प्रवक्ते बना, ‘यंग इंडिया के बोल’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:22 PM2022-05-26T19:22:55+5:302022-05-26T19:23:18+5:30
पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळणार
सांगली : स्पर्धेत उतरा, चांगले भाषण करा आणि थेट काँग्रेसचे प्रवक्ते बना, असे आवाहन करीत काँग्रेसने ‘यंग इंडिया के बोल’ ही वर्क्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर युवा प्रवक्ते निवडले जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत आहे.
युवक काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व स्पर्धेचे राज्याचे प्रभारी हनुमंत पवार यांनी या स्पर्धेची माहिती आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्यावतीने ‘यंग इंडिया के बोल’ ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा यंदाही होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत स्पर्धा होईल.
देशाचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, काँग्रेस पक्षाचे योगदान आणि केंद्र सरकारचे अपयश यावर तरुणांनी जाहीरपणे बोलले पाहिजे हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. काँग्रेसचा इतिहास आणि केंद्र सरकारचे अपयश मांडण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा होणार आहे.
राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधी
पवार म्हणाले, जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना पाच, तीन व दोन हजाराचे रोख बक्षिस आहे. एक हजारची तीन बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. तसेच प्रमाणपत्रही दिले जाईल. राज्यस्तरावरील विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळेल. स्पर्धेतून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रवक्ते निवडले जाणार आहेत. स्पर्धा ३५ वर्षाच्या आतील तरूणांसाठी असणार आहे. सात मिनिटाचा बोलण्याचा कालावधी असून वक्तृत्व शैली, अभ्यास याचा विचार करुन परिक्षक विजेते निवडतील. नोंदणीसाठी पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज सरगर, उपाध्यक्ष गीतांजली पाटील, हर्षद कांबळे, गणेश देसाई, श्रवण मगदूम, विनायक कोळेकर, सलमान मिस्त्री, प्रतीक बजबळे आदी उपस्थित होते.