इस्लामपूर : महागाईमुक्त भारत, सिलिंडर आणि इंधन दरवाढीविरोधात येथील काँग्रेसपक्षाच्या वतीने तहसील कचेरी चौकात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाई वाढवून सामान्य जनतेची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या भीतीने गॅस आणि इंधनाच्या किमती सरकारने रोखून धरल्या होत्या.परंतू निवडणूक संपताच दरवाढ सुरू केली आहे. मागील सात दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये मोठी वाढ केली आहे. तर सिलिंडर १ हजार रुपयांच्या वर गेला आहे. जीवनावश्यक वस्तू, खाद्यातेलाच्या किमती वाढल्याने जगणे अशक्य झाले आहे.यावेळी ॲड. आकिब जमादार, ॲड. आर.आर. पाटील, शहर महिला अध्यक्षा इंदूताई चौधरी, अर्जुन खरात व कार्यकर्ते उपस्थित होते.
इस्लामपुरात काँग्रेसचे गॅस, इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 7:03 PM