सांगलीत मोदी सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:16 PM2023-03-24T20:16:15+5:302023-03-24T20:16:25+5:30
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईला विरोध, भाजप निषेधाच्या घोषणा
शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ येथील काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. खासदारकी रद्द करून मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला. ‘मोदी हटाव, लोकशाही बचाव’, ‘लोकशाहीची हत्या करणार्या मोदी सरकार धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याबद्दल सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला आघाडीच्या शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील काँग्रेस कमिटीसमोर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
विशाल पाटील म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. गेल्या निवडणुकीत फसव्या आश्वासनामुळे तीनशेपेक्षा जादा खासदार निवडून आले. राहुल गांधींनी लोकसभेत सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याची कारवाई तातडीने झाली. लोकसभेतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र जनतेतील आवाज भाजप सरकार दाबू शकणार नाही. घाबरून माफी मागणारे माफीवीर आम्ही नसून क्रांतीकारकांची आम्ही मुले आहोत. यापुढे लढणार आणि भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घाणेरडे राजकारण चालू आहे. राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानी संबंधाची पोलखेल केल्याने भाजप बिथरला आहे. मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांचा राग मनात धरून सूड उगवण्यासाठी प्रयत्न केला. ही कारवाई हुकूमशाही पद्धतीने केलेली आहे. ही तर मोदी अस्ताची सुरुवात आहे.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, प्रकाश मुळके, माजी नगरसेवक करीम मिस्त्री, रवींद्र वळवडे, संजय कांबळे, मालन मोहिते, सनी धोतरे, महावीर पाटील, डी.डी.चौगुले, भाऊसाहेब पवार, अजित ढोले, आदिनाथ मगदूम, पी.एल.राजपूत, मौला वंटमोरे, अल्ताफ पेंढारी, आशिष चौधरी, आशिष कोरी आदी सहभागी झाले होते.