सांगली : सूरत येथील न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर भाजपने खोट्या गुन्ह्यात राहुल गांधींना अडकविल्याची टीका करीत काँग्रेसनेसांगलीत आज, गुरुवारी सायंकाळी निदर्शने केली. मोदी सरकारचा निषेधही केला.येथील काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. ‘चले जाव, चले जाव, हुकुमशाही सरकार चले जाव’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले म्हणाले की, मोदी सरकारविरोधात बोलणाऱ्या देशातील प्रत्येक नेत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. हुकुमशाही पद्धतीने सरकार चालविले जात आहे. मोदी आडनावावरुन खोटे गुन्हे दाखल करण्यास सरकारने भाग पाडले आहे. असे अनेक खोटे गुन्हे देशभरातील विरोधी नेत्यांवर दाखल केले जात आहेत. याविरोधातील काँग्रेसची लढाई थांबणार नाही. राहुल गांधी हे निडर नेते असल्याने तेही या गोष्टीने डगमगणार नाहीत.राहुल गांधी यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. बेमुदत आंदोलने करण्यात येतील. मोदी सरकारला आता जनताच धडा शिकवेल, असे ते म्हणाले. आंदोलनात नगरसेवक तोफिक शिकलगार, प्रकाश मुळके, आशिष कोरी, सनी धोतरे, रवींद्र वळिवडे, पैगंबर शेख, अरविंद पाटील, मौलाली वंटमोरे, बाळासाहेब पाटील, देशभूषण पाटील, अशोक सिंग राजपूत आदी सहभागी झाले होते.
राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर सांगलीत काँग्रेसची निदर्शने, मोदी सरकारचा केला निषेध
By अविनाश कोळी | Published: March 23, 2023 7:15 PM