लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत महाविकास आघाडीने जे करून दाखविले ते जिल्ह्यात सर्व संस्थांमध्ये व निवडणुकांत करायचे आहे. त्यासाठी काँग्रेस गटा-तटात नव्हे, तर एका छतात राबली पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात मंगळवारी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांनी पटोले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत पटोले यांनी सर्वांशी संवाद साधला. प्रत्येकाची मते जाणून घेतली. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते दिवंगत पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत. सांगली हा वसंतदादांचा जिल्हा असल्याने या जिल्ह्याबद्दल मला आदर वाटतो. काँग्रेस याठिकाणी आणखी मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. कोणीही गटा-तटाचा विचारसुद्धा करू नये. एकसंध राहिल्यानंतर कसे यश मिळू शकते, हे नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढेही केवळ पक्ष म्हणून सर्वांनी एकत्रित राहावे. पक्षामार्फत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. कधीही माझ्याकडून दुजाभाव होणार नाही. जिल्ह्यातील विकासकामे किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील तर त्यासाठी शासनामार्फत मदत केली जाईल.
सात जणांचा पक्षप्रवेश
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर आदगोंडा पाटील, भाजपचे सरचिटणीस सुलेमान मुजावर यांच्यासह प्रा. नेमीनाथ बिरनाळे, प्रा. अरविंद जैनापुरे, प्रा. लक्ष्मण मोरे, प्रा. सचिन पाटील, प्रा. पंकज बिरनाळे या सात जणांनी मंगळवारी पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार
सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी योग्य वेळ येताच दौरा करणार आहोत. जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांची सोडवणूकही केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.