कडेगाव : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे खजिनदार पद मी गेली १५ वर्षे सांभाळले. प्रदेश कॉँग्रेस कमिटीत निधीची कमतरता असताना, आर्थिक अडचणीवर मात करून, सर्वांना बरोबर घेऊन एकसंधपणे काम केले. मी स्वत:हून खजिनदार पद नाकारले आहे. काही तात्त्विक मुद्द्यांवरून याबाबत वाद झाले. परंतु मुंबईत गेल्यावर हा वाद मिटविणार आहे. कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा मेळाव्यात याबाबत बोललो. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत केले.कदम म्हणाले, राजकारणातील अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. कॉँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक काम केले आहे. मी पदासाठी नाही, तर जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करणारा नेता आहे. २० वर्षे मंत्री असताना कोणताही भेदभाव न मानता सर्वांची कामे कर्तव्य म्हणून धडाक्याने केली. सध्याही राज्यस्तरावर पक्षकार्याबरोबर जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांना उपाध्यक्षपद देण्याबाबत मीच शिफारस केली होती. आम्ही एकसंधपणे काम करीत आहोत. शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही. राज्यात सर्वत्र दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना, तातडीने उपाययोजनांची कार्यवाही झाली पाहिजे. टॅँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, लोकांच्या हाताला काम याबाबत तात्काळ निर्णय झाले पाहिजेत. पुढील आठवड्यात जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहे. जिल्ह्यात आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्याचा दौरा करून तेथील दुष्काळी उपाययोजनांबाबत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. (वार्ताहर)
कॉँग्रेसचे खजिनदार पद स्वत: नाकारले
By admin | Published: April 24, 2016 11:02 PM