अविनाश कोळीसांगली : गटतट, वादविवाद, कुरघोड्या, छुप्या संघर्षाचे दीर्घ ग्रहण जिल्हा काँग्रेसने आजवर सोसले. नुकसानाच्या अनेक कहाण्याही काँग्रेसच्या प्रवासात नोंदल्या गेल्या. या कहाण्यांना दफन करीत काँग्रेसमधील नव्या पिढीतील नेत्यांनी एकत्र येत पक्षाला सांगलीची जागा मिळावी म्हणून लढा उभारला. पक्षाच्या राज्य व केंद्र स्तरावरील मैदानापर्यंत षट्कार खेचून दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. जागावाटपात ते अखेर कमी पडले; पण लढा देताना काँग्रेसला गटबाजीच्या ग्रहणातून बाहेर काढून एकवटण्यात त्यांना यश मिळाले.
सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या जुन्या पिढीतील नेत्यांच्या निधनानंतर आता नव्या पिढीच्या हाती पक्षाचे दोर आले आहेत. गेल्या दहा वर्षांत डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख, हाफिज धत्तुरे या काँग्रेस नेत्यांच्या निधनाने पक्षाला मोठे धक्के बसले. मात्र, त्यातून सावरत आता नव्या पिढीतील काँग्रेसचे नेते एकवटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पक्षाचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील असताना त्यांचा जिल्ह्यावर अंमल होता. पण, दुसऱ्या पिढीत प्रकाशबापू पाटील, मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात जिल्ह्याच्या नेतृत्वावरून सुप्त संघर्ष होता. निवडणुकांमधील पराभवाच्या कारणावरून काँग्रेसअंतर्गत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला. सत्य काहीही असले तरी यामुळे जिल्हा काँग्रेस सतत गटबाजीत विभागलेली दिसून आली. पक्षाच्या बैठकांनाच एकत्र येण्याची औपचारिकता दाखविली जात होती. पाच वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनी सांगलीत येऊन काँग्रेसमधील गटबाजीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दीर्घकाळ काँग्रेसच्या गटबाजीची चर्चा राजकीय पटलावर होत राहिली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसअंतर्गत वातावरणाने १८०च्या कोनात वळण घेतले आहे. कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसचे नवे चित्र रेखाटले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा मिळावी म्हणून याच काँग्रेसमधील नव्या पिढीने दिल्लीपर्यंत एकत्रित संघर्ष केला. या लढाईत त्यांच्या वाट्याला अपयश आले; पण नेत्यांचा एकसंध लढा सुरू आहे. त्यामुळे विभागलेले कार्यकर्तेही एकवटल्याचे चित्र अनेक वर्षांनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये दिसू लागले आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्हा काँग्रेसचे नेते व आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील व जितेश कदम आदी नेते या लढाईच्या निमित्ताने एकवटले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळविल्यानंतर सांगलीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा घेण्यात आली होती. त्यावेळीही काँग्रेस नेत्यांनी अशीच एकजूट दाखविली होती. मात्र, कार्यकर्त्यांना त्यावेळी ती औपचारिकता वाटली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.