लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील राजकीय घडामाेडींवर माझे लक्ष आहे. या तालुक्याचे पालकत्व स्वीकारून सर्व प्रश्न मार्गी लावू. कार्यकर्त्यांना बळ देऊन नव्या जाेमाने काँग्रेस पुन्हा उभी करू, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रविवारी शिराळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
शिराळा येथील शासकीय विश्रामगृहात आयाेजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, तालुकाध्यक्ष ॲड. रवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर शिराळा मतदारसंघ पोरका झाला आहे. साहेब, तुम्हीच आता आमचे पालकत्व स्वीकारा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी कदम यांना केली. यावेळी कदम म्हणाले, शिराळा तालुका काँग्रेस पक्षाच्या विचारांचा आहे. यापुढेही आपण पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी तालुक्याच्या प्रत्येक गावात दौरा करणार आहे. तालुक्यात पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सहकार्य करू. चांदोली अभयारण्यातील प्रश्न, वाकुर्डे योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांचा प्रश्न मार्गी लावू.
काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत म्हणाले, शिराळा तालुक्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी गावोगावी दौरा करू.
यावेळी पोपट कदम, संजय नायकवडी, कादर नायकवडी, अलका साळुंखे, सर्जेराव कोकाटे, विश्वास शिंदे, राजू कुलकर्णी, सुनील घोलप, संपत पाटील, तुकाराम चव्हाण, राजू पाटील, रवींद्र कोकाटे, नंदकुमार शेळके, आदी उपस्थित होते.
चौकट
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
यावेळी पाचुंब्री येथील संपत पाटील यांनी परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मांडला. वाकुर्डे योजनेचे पाणी कराड तालुक्यात जाते, मात्र शिराळा तालुक्यातील आमच्यासारख्या काही गावांना मिळत नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.