काँग्रेसचा चवताळलेला वाघ काय करेल, याची भाजपला कल्पना नाही - विश्वजित कदम
By अविनाश कोळी | Published: August 12, 2023 07:14 PM2023-08-12T19:14:46+5:302023-08-12T19:16:38+5:30
लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार
सांगली : एखाद्या वाघाला कोपऱ्यात टाकले तर तो चवताळून उठतो. काँग्रेसही चवताळलेला वाघ आहे. लोकसभा निवडणुकीत तो भल्याभल्यांना गारद करेल. भाजपला याची कल्पना नाही, असे मत काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले वातावरण आहे. मित्रपक्षांसह केलेली महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपने राजकारणात, लोकशाहीत चुकीचा पायंडा पाडलेला आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडून सत्तेचे राजकारण ते करताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे सारे मनसुबे धुळीस मिळतील.
पुरवणी बजेटच्या माध्यमातून निधी वाटप करताना दुजाभाव करण्यात आला. विरोधकांच्या मतदारसंघासाठी निधी दिला नाही. त्यामुळे जनतेवर अन्याय झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारा नाही. राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडी व राज्यातील महाविकास आघाडी एकसंधपणे काम करेल.
लोकसभेवर काँग्रेसचाच झेंडा
यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. एकसंधपणे आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे पुन्हा बालेकिल्ला ताब्यात घेऊ. ही जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे कदम म्हणाले.