सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे तौफिक शिकलगार यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा ३ हजार ९९५ मतांनी पराभव केला. काँग्रेसने ही जागा राखत खणभागातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
शिकलगार यांना ७४२९, भाजपचे गवळी यांना ३४३४, शिवसेनेचे चंडाळे यांना ५३५, तर अपक्ष सुरेश सावंत यांना ५८७, वंचितचे ककमरी यांना २१, तर अपक्ष समीर सय्यद यांना १८ मते मिळाली.
काँग्रेसचे नगरसेवक हारूण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने त्यांचे चिरंजीव तौफिक यांना उमेदवारी दिली. तर, भाजपकडून अमोल गवळी, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, अपक्ष सुरेश सावंत, वंचित आघाडीचे उमरफारूख ककमरी निवडणूक रिंगणात होते.
काँग्रेस व राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार यांनी प्रभाग पिंजून काढला होता.
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी ४९.९८ टक्के मतदान झाले होते. बुधवारी स्टेशन चौकातील महापालिकेच्या घरपट्टी कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच तौफिक शिकलगार यांनी १३०० मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या तीनही फेऱ्यांत ते आघाडीवर राहिले. शिकलगार यांच्या विजयाची घोषणा होताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
उमेदवारांना मिळालेली मते
तौफिक शिकलगार (काँग्रेस) - ७४२९
अमोल गवळी (भाजप) - ३४३४
महेंद्र चंडाळे (शिवसेना)- ५३५
सुरेश सावंत ( अपक्ष) - ५८७
उमरफारूक ककमरी (वंचित) -२१
समीर सय्यद ( अपक्ष) - १८