Sangli: काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी समर्थकांकडून अपहरण; चाकू, पिस्तुलाच्या धाकाने बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:59 PM2024-10-03T16:59:31+5:302024-10-03T16:59:56+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा
मिरज : शिपूर (ता. मिरज) येथील काँग्रेस कार्यकर्ते रणजीत देसाई यांचे मंगळवारी रात्री गावातील राजकीय वादातून राष्ट्रवादी समर्थकांनी चाकू व पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केले. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांची सुटका झाली. मारहाणीत देसाई यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते रणजीत लालासाहेब देसाई (वय ४८) हे सांगली येथून मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शिपूर येथे चालले होते. मिरज ते सलगरे रस्त्यावर पायापाची वाडी बस स्थानकाजवळ त्यांना पाठीमागून मोटारीने धडक देऊन खाली पाडले. देसाई यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत तोंडावर रुमाल बांधलेल्या तिघांनी मोटारीत जबरदस्तीने बसवून मोटार व्यंकोची वाडी, आरग, मंगसुळी मार्गाने नेली. मोटारीत मारहाण करून देसाई यांच्या खिशातील पाकीट व त्यातील चार हजार रुपये हिसकावून घेतले.
यावेळी प्रसंगावधान राखत रणजीत देसाई यांनी मोटारीच्या एक्सिलेटरमध्ये पाय अडकविल्याने गाडीचा वेग कमी झाला. यावेळी देसाई यांनी ‘वाचवा.. वाचवा..’ असा ओरडा केला. यावेळी मोटार आरग बस स्थानक परिसरात होती. गाडीत काहीतरी गडबड आहे, अशी शंका तेथील नागरिकांना आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. मोटार वेगात लक्ष्मीवाडीच्या दिशेने गेल्याने आरगेतील काही जणांनी फोन करून लक्ष्मीवाडी मंगसुळी येथील नागरिकांना याबाबत सूचना दिली. लक्ष्मीवाडी व आरग येथील तरुणांनी गाडीचा पाठलाग केल्याने लक्ष्मीवाडी मंगसुळी हद्दीजवळ मोटार थांबली. रणजीत देसाई यांची सुटका करून दोन हल्लेखोरांनी अंधारात पलायन केले.
यावेळी मोटार चालविणारा शिवाजी महाडिक यास देसाई यांनी ओळखले. हल्लेखोरांनी मोटारीत बेदम मारहाण केल्याने देसाई यांच्या डाव्या हाताचे मनगट फॅक्चर झाले आहे. सुटका झाल्यानंतर रणजीत देसाई यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवाजी श्रीकांत महाडिक व दोन अनोळखी तरुणांविरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
जखमी खासदार समर्थक
रणजित देसाई व शिवाजी महाडिक यांच्यात ग्रामपंचायत निवडणूक वादातून वैमनस्य आहे. यापूर्वीही महाडिक यांनी देसाई यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्या प्रकरणी महाडिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या अपहरणाचे वृत्त समजताच खासदार विशाल पाटील यांनी शिपूर येथे रणजित देसाई यांची भेट घेऊन विचारपूस केली.