मिरज : लोकसभा निवडणूक निकालास एक दिवस शिल्लक असताना, राजकीय कार्यकर्त्यांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मिरजेत काँगे्रस कार्यकर्त्यांनी पंचायत समिती सभापतींच्या साक्षीने भाजपच्या विजयावर लाखाची पैज लावली आहे. मिरज तालुक्यात व मिरज पूर्व भागात काँग्रेस व भाजपमध्ये चुरशीची निवडणूक झाली. पूर्व भागातील गावांमध्ये भाजप उमेदवार आघाडी घेणार असल्याचा दावा काँग्रेसचेच कार्यकर्ते करीत आहेत. मिरज पंचायत समिती सभापती सुभाष पाटील यांच्यासमोर निकालाची चर्चा रंगली. प्रतीक पाटील निवडून येणार की संजय पाटील, याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आले. निकालावरुन काँगे्रस कार्यकर्त्यांत मतभेद टोकाला पोहोचल्याने सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील व शिपूरचे काँगे्रस कार्यकर्ते रणजित देसाई यांच्यात त्वेषाने एक लाखाची पैज लागली. जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, पं. स. सदस्य अरुण राजमाने, प्रकाश मलमे, रावसाहेब बेडगे, विजयनगरचे सरपंच राजू कोरे यांच्या उपस्थितीत ठरलेल्या देसाई व पाटील यांच्यातील पैज कोण जिंकणार, हे शुक्रवारी निकालानंतर समजणार आहे. (वार्ताहर)
मिरजेत भाजपच्या विजयावर काँग्रेस कार्यकर्त्यांची पैज
By admin | Published: May 15, 2014 12:44 AM