सांगली : भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग क्र. ३७ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवा नेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे, आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन राज्यात व केंद्रात सत्ता मिळविली होती; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशोब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांमध्ये हिसका दाखविला आहे.
आता सांगली महापालिका निवडणुकीच्यादृष्टीनेही अशाच पद्धतीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्वासने देऊन समोर येत आहेत; परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल.श्रीमती पाटील यांचा कदम यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे नेते दिवंगत मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्प नाम्यातील ९0 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग ३७ मध्येच तीन कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच नागरिकांनी सत्ता द्यावी, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते; पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची स्वप्ने पाहत आहे. कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रीतम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.हवा फक्त कॉंग्रेसची!शिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्त काँग्रेसचीच हवा राहील.