काँग्रेसचे सांगलीत ‘शर्म करो मोदीजी’ आंदोलन, पुलवामा हल्ल्याप्रकरणी सरकारचा निषेध
By अविनाश कोळी | Published: April 17, 2023 06:55 PM2023-04-17T18:55:19+5:302023-04-17T18:55:29+5:30
सांगली : पुलवामा हल्ल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल व भाजपचे नेते सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली ...
सांगली : पुलवामा हल्ल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल व भाजपचे नेते सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. हाच धागा पकडत काँग्रेसने सोमवारी सांगलीत ‘शर्म करो मोदीजी शर्म करो’ आंदोलन केले.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यांनी मांडलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहेत. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चूक त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. असे असतानाही पंतप्रधान मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले. मोदींनी अजूनही या आरोपांना उत्तर दिलेले नाही. आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करतो.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, आशिष कोरी, नंदाताई कोलप, रवींद्र वळवडे, महावीर पाटील, अल्ताफ पेंढारी, मौलाली वंटमुरे, शीतल सदलगे, विजय आवळे, आयुब निशानदार, सुशांत गवळी, अमित पारेकर, श्रीनाथ देवकर, माणिक कोलप, अमोल पाटील, राजेंद्र कांबळे, सुजित लकडे, उत्तम सूर्यवंशी, दीक्षित भगत, गजानन आवळे आदी सहभागी झाले होते.