कुपवाड : तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखविण्यासह बिनशेतीची आॅर्डर काढून देतो, असे खोटे सांगून कानडवाडीतील चौघांना एकोणतीस लाखाचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार विशाल दिलीप काळे (रा. कुपवाड) यास तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी काळेच्या घराची झडती घेतली असता, बनावट शासकीय कागदपत्रे, शिक्के जप्त करण्यात आले असून त्याचे कनेक्शन पुण्यापर्यंत असल्याचे उजेडात आले आहे.
पुण्यातील सहकाºयांच्या मदतीने काळेने गंडा घातला आहे. राज्यातील अनेक गरजू मुलांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट शासकीय कागदपत्रांच्या व शिक्क्यांच्या आधारे अनेकांची फसवणूक केल्याचे उजेडात येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी बुधवारी विशाल काळेच्या शरदनगर (कुपवाड) येथील राहत्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरात महसूल, वन विभाग व बीएसएनएल विभागाची बनावट शासकीय कागदपत्रे व शिक्के सापडले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले विशालचे आई-वडील दिलीप शिवाजी काळे व वंदना दिलीप काळे हे दोघे अद्याप फरार आहेत. त्यामुळे काळेच्या पुण्यातील सहकाºयाला व त्याच्या आई-वडिलांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. त्यांच्याविरोधात प्रदीप जिनपाल खोत (रा. कानडवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित विशाल, दिलीप व वंदना हे तिघेही फिर्यादी खोत त्यांच्या दुकानात नेहमीच जात होते. त्यांची ओळख वाढली. खोत यांच्या मालकीची भोसे (ता. मिरज) येथे शेतजमीन असल्याने संशयित विशालने, त्या जमिनीत झोन बदल करून देतो, त्याची बिनशेती करून देतो, माझी मंत्रालयात व शासकीय अधिकारी यांच्याशी चांगली ओळख असल्याने मी तुमचे काम करून देतो, म्हणून दहा लाख रुपये घेतले. तसेच प्रदीप यांचे मेहुणे संजय चौगुले (रा. भोसे) यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाला रेल्वेत भुसावळ येथे कनिष्ठ अभियंता या पदावर, तर दुसरा मुलगा सुशांत यास वन खात्यात वनरक्षक म्हणून नोकरीस लावतो, असे सांगून ११ लाख ५० हजार रूपये घेऊन फसविले आहे.याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करीत आहेत.अनेकांना घातला भामट्याने गंडासंजय चौगुले यांच्या मित्राचा मुलगा दिग्विजय राजगोंडा पाटील यांच्याकडून स्टेट बॅँकेत शिपाई पदावर नोकरी लावतो म्हणून तीन लाख रुपये घेतले आहेत. आशिष प्रमोद पाटील याला बीएसएनएलमध्ये नोकरी लावतो म्हणून विशाल व त्याच्या आई- वडिलांकडून साडेचार लाख रुपये घेतले. असे एकूण एकोणतीस लाख रुपयास फसविले आहे.