सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचे ‘कनेक्शन’ राधानगरीपर्यंत (जि. कोल्हापूर) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहेत. अटकेत असलेल्या विकास फराकटे याचा मावस भाऊ व सांगली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील एक कर्मचारी अशी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. फराकटे याच्या मावस भावाच्या शोधासाठी पोलिसांनी राधानगरीत छापे टाकले, पण त्याचा सुगावा लागला नाही. सहा महिन्यांपूर्वी पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी आतापर्यंत २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामसेवकांना अटक झाली आहे. पंधरा संशयितांना आतापर्यंत अटक झाली आहे. गेल्या आठवड्यात हरिपूर (ता. मिरज) येथील संजय कांबळे, विकास फराकटेसह चौघांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. चौघांच्या चौकशीतून जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याने बाहेर काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने हा पेपर फराकटेला दिला. फराकटेने पुढे त्याच्या झेरॉक्स काढून उमेदवारांना दिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मावसभावाच्या शोधासाठी पोलिसांनी राधानगरीत छापे टाकले, पण तो सापडला नाही. लेखा विभागातील कर्मचारीही गायब झाला आहे. (प्रतिनिधी)
पेपरफुटीचे राधानगरीपर्यंत ‘कनेक्शन’
By admin | Published: April 16, 2016 12:30 AM