सांगली : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना कृषी साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असतानाही तेथील दोषींवर कारवाई होत नाही. हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे कृषी साहित्याचे वाटप, तसेच वीज कनेक्शन नसतानाही २८ जणांना कृषिपंपांचे वाटप झाले आहे. तरीही या चौकशीत जिल्हा प्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी मंगळवारी केला.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली. या बेठकीनंतर सुयोग औंधकर व बळिराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, १२ मार्च २०१८ रोजीच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत बळिराजा संघटनेचे बी. जी. पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष औंधकर यांनी मरळनाथपूर येथील भ्रष्टाचाराचे पुरावेच अधिकाºयांसमोर सादर केले. त्याची पाहणी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते.
ही घटना घडून तीन महिने झाले तरीही जिल्हा प्रशासनाकडून एकाही दोषीवर कारवाई केलेली नाही. आपल्या आदेशाला ज्यांनी केराची टोपली दाखवली, त्यांच्यावर जिल्हाधिकारी तथा प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणून आपण कारवाई करावी. तसेच चौकशीची मुदत संपलेली आहे. दोषींकडून रक्कम वसूल करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधितांच्या वरिष्ठ कार्यालयास तात्काळ द्यावेत. अन्यथा संबंधित व आपणाविरुद्ध योग्य त्या न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी, असेही औंधकर यांनी निवेदनात म्हटले आहे.बैठकीत ६ अर्ज निकालीजिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत २१ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे निकाली काढली. यामध्ये कृषी, पाटबंधारे, शिक्षण, महसूल, क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभागाबाबत तक्रारी दाखल आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीस महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कडेगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर, प्रभारी तहसीलदार श्रीमती एस. जे. कोळी, डॉ. विजय पाटील, विलास सगरे यांच्यासह अशासकीय सदस्य, तक्रारदार उपस्थित होते.