विटा : प्रेमसंबंध निर्माण करण्यासाठी सतत पाठलाग केल्याने त्रासाला कंटाळून विवाहिता कोमल आनंदा बिसुरकर (वय २७, रा. शाहूनगर, विटा) हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मंगळवारी तिचा भाऊ प्रतीक सावंत याने विटा पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित ॲड. ऋषीकेश आनंद सूर्यवंशी (वय २६, रा. विटा) या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.येथील विवाहिता कोमल बिसूरकर या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्या कऱ्हाड रस्त्यावरील नीलसागर हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या डॉ. जाधव यांच्या खोलीत भाड्याने राहात होत्या. संशयित ॲड. ऋषीकेश सूर्यवंशी हा त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्यांचा सतत पाठलाग करीत होता. त्यांच्या घरी व त्या काम करीत असलेल्या ठिकाणी ॲड. सूर्यवंशी याचे येणे-जाणे वाढले होते.या त्रासाला कंटाळून कोमल यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संशयित ॲड. सूर्यवंशी याची पोलिसांनी चौकशी सुरू केली. मंगळवारी कोमल यांचा भाऊ प्रतीक सावंत याने संशयित ऋषिकेश सूर्यवंशी याच्याविरुद्ध बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी सूर्यवंशी यास अटक केली आहे.
Sangli: प्रेमसंबंधासाठी सतत पाठलाग, त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; वकिलास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:40 AM