सांगली : दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व संघटनांनी मोर्चास पाठींबा दिला आहे.लहान मुलेही मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी शुक्रवारी दिली.प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. बाबूराव गुरव, डॉ. संजय पाटील, सचिन सव्वाखंडे, उत्तम कांबळे, आशिष कोरी यांनी कष्टकऱ्यांची दौलत येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर होईल. कोणाचेही भाषण होणार नाही. पाच मुलींच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले जाईल.
मोर्चाच्या पुढे लहान मुली व महिला असतील. त्यांच्या मागे मुले व पुरुष, असा क्रम राहिल. अग्रभागी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा व संविधाची प्रतिकृती असेल. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल. मोर्चाच्या मार्गावर कोणतेही गैरकृत्य अथवा अस्वच्छता होऊ नये, याची काळजी घेतली आहे.ते म्हणाले, जिल्हास्तरावर हा मोर्चा निघत असला तरी लोकशाही, संविधान व सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी हा मोर्चा आहे. जोपर्यंत संविधान सुरक्षित आहे, तोपर्यंत लोकशाही व सर्व सामान्य माणूस सुरक्षित आहे.
मोर्चात कोणत्या घोषणा द्यायच्या, याचेही निजोजन केले आहे. मोर्चात असंविधान पद्धतीने वर्तणूक करणारा कोणी घुसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांना केली आहे. संविधानाची प्रत जाळल्याचा जिल्हा परिषदेने त्यांच्या सभेत ठराव केला. तसाच ठरावा महापालिकेने १० सप्टेंबरला होणाऱ्या महासभेत करावा.काँग्रेसने सहभागी व्हावेप्रा. बाबूराव गुरव म्हणाले, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. सांगलीतही काँग्रेसने बंद व मोर्चाचे नियोजन केले आहे. काँग्रेसने कार्यकर्त्यांसह संविधान मोर्चात सहभागी व्हावे. यादिवशी मोर्चासाठी येणाऱ्या लोकांची वाहने अडवू नयेत, असे आवाहन गावपातळीवरील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना केले आहे.