मिरज : विविध शासकीय निधीतील मंजूर कामे सुरू न केल्याबद्दल मिरजेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे यांची समितीद्वारे चौकशी करून हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत कारवाईचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी मिरज संघातील नाबार्ड, आमदार फंड, तेरावा वित्त आयोग, विशेष दुरूस्ती, मुख्यमंत्री आकस्मिक निधीतून मंजूर झालेली व शासनाने निधी दिलेल्या कामांचा ९ ते १० महिन्यांपूर्वी उद्घाटन होऊनही या बांधकाम विभागाने कामे सुरू न करता आमदारांचा अवमान केल्याची तक्रार आ. खाडे यांनी केली. याबाबत माजी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे लेखी तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावर उत्तर देताना, तक्रार अंशत: खरी असल्याचे मान्य करून, मिरज तालुक्यातील एकूण ६६ कामे मंजूर असून, त्यातील फक्त दोन कामे पूर्ण झाल्याचे व ४८ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी समिती स्थापन करून कारवाई केली जाईल, असे सांगितले. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी, अकार्यक्षम अधिकाऱ्याच्या चौकशीस व कारवाईस वेळ लागेल. या अधिकाऱ्यास आपण निलंबित करणार का? असा प्रश्न केला. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रकरणाची चौकशी करून हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश विधानसभेत दिले. (वार्ताहर)कामांना मुहूर्त नाहीमिरज संघातील नाबार्ड, आमदार फंड, तेरावा वित्त आयोग, विशेष दुरूस्ती, मुख्यमंत्री निधीतील कामांची उद्घाटने होऊनही ती कामे सुरू झाली नसल्याची तक्रार आहे.
बांधकाम अभियंत्याची चौकशी
By admin | Published: December 15, 2014 10:44 PM