सांगली : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा उभी राहात असताना दुसरीकडे पूरपट्ट्यात आपत्तीला निमंत्रण देणारी बांधकामे उभी राहात आहेत. कर्नाळ रस्ता, बायपास रस्ता, जुना बुधगाव रस्ता याठिकाणच्या नैसर्गिक नाले व ओतात पक्की बांधकामे उभी होत असताना त्यावर कारवाईचे धाडस ना महापालिकेने दाखविले, ना जिल्हा प्रशासनाने. सांगली शहरात गेल्या १७ वर्षांत अनेकदा महापूर येऊन गेले. २००५ आणि २००६ च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले, ओत आणि पूरपट्टा यांच्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू झाली. त्यावेळी सामाजिक संघटनांनीही याविषयी आवाज उठविला होता. त्यामुळेच महापालिकेच्या ८ ऑगस्ट २००६ रोजीच्या महासभेत ठराव करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नैसर्गिक नाले व त्यांच्या बफर झोनमध्ये मिळकतींचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत व तसे प्रस्ताव आले तर ते स्पष्टपणे नाकारावेत, असा निर्णय झाला होता. याबाबतच्या सूचना नगररचना, गुंठेवारी विभागाला देण्यात आल्या होत्या.नियम असतानाही अशी बांधकामे झालीच तर ती काढून टाकावीत, असा स्पष्ट ठराव करण्यात आला होता. तरीही नियमांना हरताळ फासण्याचे काम सातत्याने होत गेले. एकाही अधिकाऱ्याला याबाबत विचारणा न झाल्याने याकामी सातत्य राखण्याचे काम महापालिकेच्या यंत्रणांनी केले.सांगलीत २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर २०२१ मधील महापुरावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपट्ट्यातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. शासन याबाबत ठोस निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले होते. पूर ओसरल्यानंतर दोन्ही नेत्यांची आश्वासनेही ओसरली. गेल्या सतरा वर्षांत उपाययोजना न होता, आपत्तीची तीव्रता वाढविणारी अतिक्रमणे प्रशासनाच्या कृपेने झाल्याचा नागरिकांमधून आरोप आहे. तरीही प्रशासन लक्ष देत नाही.ओत झाले गायबसांगलीच्या कर्नाळ रस्ता, बायपास व जुना बुधगाव रस्त्यावर मोठे ओत होते. गेल्या काही वर्षांत यात भर टाकून अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. हाॅटेल्स, ढाबे, निवासी इमारती, गॅरेज यांची बांधकामे होत आहेत. घरांची बांधकामेही मोठ्या प्रमाणावर झाली. भर टाकल्यामुळे ओत आत दिसत नाहीत.नाले मोजताहेत अखेरची घटका, एकच शिल्लकसांगलीत एकेकाळी १६ नाले होते. आता एकच बायपास रोडवरचा नाला शिल्लक आहे. अतिक्रमणांमुळे हा नालाही आता शेवटच्या घटका मोजत आहे.
आला पावसाळा; लागा कामाला, पूरपट्ट्यातील बांधकामे शोधायला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:45 PM