सांगली : बदलते वातावरण, पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाट्याचे दर अद्यापही कायम असून, सर्व भाज्यांमध्ये सरासरी २० रुपयांनी वाढल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आहे.
प्रतिकिलो ४० ते ६० रुपये प्रतिकिलोवर असणाऱ्या भाज्या ६० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. गवार, वांग्याचे दर वाढले आहेत, तर पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
चौकट
किराणामालाचे दर स्थिर असल्याने काहीसा दिलासा असलातरी धान्यातील दरवाढ कायम आहे. चांगल्या प्रतीचा गहू प्रतिक्विंटल ३२०० ते ३४०० वर पोहोचला आहे, तर ज्वारीच्या दरातही वाढ झाली आहे. बार्शी शाळूला ग्राहकांची चांगली पसंती आहे. त्याचा दर ४३०० ते ४६०० पर्यंत आहे.
चौकट
फळांच्या दरात वाढ
सफरचंदाची आवक चांगली असतानाही दरात मात्र वाढ झाली आहे. पंधरवड्यापूर्वी ८० रुपयांपर्यंत असणारा दर आता ११० ते १२० प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला आहे.
चौकट
बार्शी शाळूला मागणी
सध्या धान्याची चांगली विक्री होत असल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या महिन्यात अजून विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातही चांगल्या प्रतीचा बार्शी शाळूची आवक बाजारात वाढली आहे. ग्राहकही त्यांची खरेदी करत आहेत.
चौकट
गवारी, दोडका दर वाढले
या आठवड्यात गवारीचे प्रतिकिलो दर वाढताना ते ८० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. लसूण दरात पुन्हा वाढ होताना १०० ते १२० रुपयांवर दर गेला आहे. आता बाजारपेठेला उन्हाळ्याची चाहूल लागणार असल्याने दरवाढ कायमच राहील, असा अंदाज आहे.
कोट
आठवडी बाजारात अद्यापही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, म्हणावी तशी भाज्यांची आवक होताना दिसत नाही. अजून आवक कमी होणार आहे. त्यामुळे दरवाढ अटळ वाटते आहे.
मीरासाब नदाफ, व्यापारी
कोट
पेट्रोल दरवाढीबरोबरच एकाचवेळी भाजीपाला, किराणा दरातही वाढ होत आहे. मध्यमवर्गीयांना ही अडचण येत आहेत. आता पुन्हा दरवाढ होऊ नये अशीच अपेक्षा आहे.
सुलोचना आंबेे, गृहिणी
कोट
महिनाभरापासूून ग्राहकांकडून धान्य, कडधान्यांना चांगली मागणी आहे. आवकही समाधानकारक असलीतरी आवक वाढली म्हणून दर कमी झालेले नाहीत आणि एकूणच आढावा घेतला तर दर कमी हाेण्याची शक्यता खूपच कमी आहे.
अजित पाटील, व्यापारी