सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. महापौर पदासाठी इच्छुकांनी दबावाचे तंत्र अवलंबल्याने भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी निरंजन आवटी की धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम व प्रकाश ढंग यांच्यात चुरस आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, याची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, भाजपमधील १० ते १२ नगरसेवकांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चाही रंगली आहे. हा गट राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे यंदा भाजपला महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवार १८ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजपकडे ४३ नगरसेवक आहेत. स्पष्ट बहुमत असूनही भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. महापौरपद खुले झाल्याने इच्छुकांची संख्याही वाढली होती. पण आता शेवटच्या टप्प्यात आवटी, सूर्यवंशी, बावडेकर यांचीच नावे आघाडीवर आहेत. त्यात आवटी गटाकडे सात ते आठ नगरसेवक आहेत. तर सूर्यवंशी गटाकडे चार नगरसेवकांचे बळ आहे. त्यामुळे या दोन्ही गटाने महापौर पदासाठी लाॅंबिंग सुरू केले आहे. युवराज बावडेकर हे भाजपचे निष्ठावंत आहेत. त्यांच्यासाठी मुंबईतून फिल्डिंग लावली जात आहे. इच्छुक नगरसेवकांचे नातेवाईकही उमेदवारीसाठी मैदानात उतरले आहेत. भाजपचे आमदार, खासदार, कोअर कमिटी सदस्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला जात आहे. वेगळा गट घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा रंगली आहे. पण भाजपच्या नेत्यांनी मात्र या सर्वच चर्चा फेटाळल्या असून भाजपचाच महापौर होईल, अशा आशावाद व्यक्त केला आहे.
चौकट
नाराजांचे आव्हान
भाजपच्या अडीच वर्षाच्या काळात अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. विद्यमान महापौर, उपमहापौरांसह अनेकांनी नेत्यांच्या कारभाराबद्दल उघडपणे टीकाटिप्पणी केली आहे. अशातच महापौर निवडीच्या तोंडावर १० ते १२ नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार झाल्याचे समजते. या नाराज गटाशी समझोता केल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. या गटाचे नेतृत्व करणाऱ्या काही नगरसेवकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. त्यामुळे यंदा महापौर निवडीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
चौकट
व्हीप, सहलीची तयारी
भाजपकडून महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात येणार आहे. गुरुवारी नगरसेवक व नेत्यांची एकत्र बैठक होईल. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापौर, उपमहापौरांची नावे बंद लिफाफ्यातून येणार आहेत. बैठकीतच नगरसेवकांना व्हीप दिला जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वच नगरसेवकांना गोव्याच्या सहलीवर नेण्याची तयारीही झाली आहे.