सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अद्याप नियंत्रणात असले तरी, काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घटल्याने संकटाला निमंत्रण मिळत आहे. आरोग्य विभागाने सध्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ग्रामीण भागात ९ ते १०, तर शहरी भागात ८ ते ९ इतके असल्याचे सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण २० पेक्षा अधिक असावे, असे सांगितले जाते. त्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील हे प्रमाण निम्म्याहून कमी आहे. रुग्णाच्या संपर्का्त आलेल्या किमान २० लोकांची तरी तपासणी करायला हवी. जिल्ह्याचे प्रमाण असेच कमी राहिले, तर कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोक मोकाट फिरून संसर्ग वाढविण्याचा धोका आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण सध्या नियंत्रणात असले तरी, काॅन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष करून ते वाढविण्यास बळ मिळेल. त्यामुळे आरोग्य विभागाने याबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे, कारण संकट दारावर आहे, ते गेलेले नाही.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारीच याबाबतची बैठक घेतली. त्यांनी काॅन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कमी झालेल्या प्रमाणावरच लक्ष वेधले. त्यांनी तातडीने यात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण २० पेक्षा जास्त करण्याची सूचना त्यांनी दिली आहे.
केस १
सांगलीतील पंचशीलनगर येथील एका रुग्णाने सांगितले की, कोरोना झाल्यानंतर त्यांना महापालिकेच्या यंत्रणेकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या. कॉन्टॅक्टमधील काही लोकांची नावे त्यांनी नोंदविली. किती लोकांचे त्यांनी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग केले याची कल्पना नाही. त्यानंतर वेळावेळी औषधोपचार व विलगीकरणाबाबत त्यांनी सूचना देत आढावाही घेतला.
केस २
माधवनगर रोडवर मीरा हौसिंग सोसायटीजवळील एका रुग्णाने सांगितले की, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग महापालिका कर्मचाऱ्यांनी केले, मात्र जे संपर्कात आले, त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती त्यांनी घेतली नाही. यातील काहीजणांचीच तपासणी झाली. तरीही औषधोपचार व विलगीकरणाबाबत त्यांनी माहिती दिली.
केस ३
मिरज तालुक्यातील एका रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबियांचीच नावे आरोग्य यंत्रणेने नोंदविली. त्यांचीच तपासणी केली. संपर्कातील अन्य बाहेरील व्यक्तींची किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी झाली नाही. विलगीकरण व औषधोपचाराबाबतचा आढावा यंत्रणेने व्यवस्थित घेतला.
कोट
सध्या हायरिस्कमधील काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ९ ते १० टक्के इतके आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
- डॉ. मिलिंद पोरे, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
चौकट
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती....
एकूण काेरोना रुग्ण ४८४००
बरे झालेले ४६५१६
उपचाराखाली १२७
मृत्यू १७५७