सांगली : कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, पण त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. हे रुग्ण घरात न थांबता बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी असून ते कोरोनाचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरत आहेत. याप्रकरणी दक्षता समित्यांनी त्या रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन करून बंद करावा, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्राजक्ता कोरे यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सरपंच, दहा पंचायत समितीचे सभापती, अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्राजक्ता कोरे बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सभापती आशाताई पाटील, जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, सुनीता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, डॉ. संतोप पाटील आदी उपस्थित होते.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, गाव पातळीवरील दक्षता समित्यांनी पुढाकार घेऊन गावातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना जी काही लागेल ती मदत जिल्हा परिषद करण्यास तयार आहे. परंतु, अलीकडे गावातील गृहविलगीकरणातील कोरोना रुग्ण घरात न थांबता बाहेर फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव वाढविण्यास ते जबाबदार ठरत आहेत. या रुग्णांना सूचना देऊन ते घरात थांबत नसतील तर त्यांच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन करावा, त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहोत. तसेच तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन १०० टक्के लाभार्थीचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही प्राजक्ता कोरे यांनी सरपंचांना केले.
चौकट
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा
शासनाने दिलेल्या निर्बंधानुसार कोविड प्रतिबंधित (मिनी कंटेनमेंट झोन) क्षेत्रामध्ये लोकांना फिरण्यासाठी मज्जाव करण्यात यावा. झोनमधील लोकांना घरोघरी धान्य, भाजीपाला, दूध पुरवठा करण्याचे नियोजन करावे. गावातील ग्रामदक्षता समिती, पोलीस पाटील, कोतवाल, इतर ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्राजक्ता कोरे यांनी केले.