अशोक पाटील ।
इस्लामपूर : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शहरातील मध्यवर्ती गांधी चौकातील व्यापारी बाजारपेठेचा परिसर सीलबंद केल्यामुळे तब्बल दीड महिना शांतता होती. सध्या शहरातील कोरोनाच्या रूग्णांची संख्यक कमी असली तरी नागरिकांमधील धास्ती कायम आहे. आता कंटेनमेंट झोन हटवून १५ दिवस उलटले तरीही, या बाजारपेठेत येण्यासाठी ग्राहक घाबरत आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दोन महिन्यात कोट्यवधीचा फटका बसला आहे.
पूर्वीच्या काळी उरुण-इस्लामपूर, अशी छोटी बाजारपेठ होती. आता लोकसंखेच्या प्रमाणात बाजारपेठ विस्तारली आहे. तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गणली जाऊ लागली आहे. या पेठेतील व्यापाºयांनी नारू, पटकी आदी महामारी पाहिली आहे. १९७२ चा दुष्काळ, वारणा व कृष्णा खोºयातील महापूर आदी संकटे पहिली आहेत. त्यांचा मुकाबलाही समर्थपणे केला आहे, परंतु आता कोरोनाच्या संकटातून व्यापारी पेठेला उभारी येण्यासाठी किमान दोन, तीन वर्षे लागतील, असे भाकीत केले जात आहे. कोरोनामुळे सर्वच बाजापेठ सुनीसुनी झाली आहे. ग्राहक गरजेपुरतीच खरेदी करत आहेत.
गांधी चौक प्रमुख बाजारपेठ आहे. याच परिसरातील एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी त्यांचा व्यापारही सुरू केला आहे. पण शहरासह गांधी चौकात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे.
गांधी चौक परिसरात सोन्या-चांदीची दुकाने आहेत. लग्नसराईत दहा ते बारा कोटींची उलाढाल होते. कोरोनामुळे काहींनी सोने खरेदी न करता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विवाह पार पाडले. मणीमंगळसूत्र याव्यतिरिक्त काहीही खरेदी केली नाही. बरेच विवाह तर स्थगित केले आहेत. यावर्षी कोरोनामुळे ५0 लाखांचीही उलाढाल झालेली नाही.- कपिल ओसवाल, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, इस्लामपूर
लग्नसराईत गांधी चौक ग्राहकांनी फुलून गेलेला असतो. येथे कापड, सोने, भांडी, विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. कोरोनामुळे मार्च ते आजअखेर ग्राहक नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.- प्रकाश पोरवाल, कापड व्यापारी, इस्लामपूर
इस्लामपूर येथील गांधी चौकातील कंटेनमेंट झोन उठविण्यात आला आहे. परंतु या रस्त्यावरील शुकशुकाट कायम दिसत आहे.