सांगली : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
पाण्यात वापरण्यात येणाऱ्या ४३१ ठिकाणची टीसीएलचीही तपासणी करण्यात आली असून चौदा ठिकाणी ते निकृष्ट आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाºया टीसीएलची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील १८२७ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १४७ पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये तासगाव तालुक्यात सर्वाधिक ३०, जत तालुक्यात २८, कडेगाव तालुक्यात २६, शिराळा १५, आटपाडी ६, कवठेमहांकाळ ३, मिरज १३, पलूस ६, वाळवा ११, खानापूर ९ इतके पाणी नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएलचे ४३१ नमुने तपासण्यात आले, त्यापैकी १४ नमुने दूषित आढळले. क्लोरिनचे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असणारे टीसीएल निकृष्ट असते. त्यानुसार १४ ठिकाणचे टीसीएल निकृष्ट असल्याचे समोर आले. ११७ ठिकाणी टीसीएलमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० ते ३० टक्के आढळले असून ३०० ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केहून अधिक म्हणजे योग्य असल्याचे समोर आले आहे. मिरज तालुक्यातील तानंग, कान्हरवाडी, पाटगाव, तासगाव तालुक्यातील वाघापूर, शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, कणदूर, वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, कुंडलवाडी, जत तालुक्यातील हळ्ळी, उटगी, निगडी बुद्रुक, सोनलगी व उमदी या ठिकाणी निकृष्ट टीसीएल आढळले आहे.दुष्काळात जनता होरपळत असताना, पुन्हा या नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांना विचारले असता ते म्हणाले की, दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणाºया टँकरमधील पाणी तपासणी करूनच नागरिकांना पाणी दिले जात आहे. दूषित पाणी आढळल्यास तो टँकर नागरिकांना पिण्यासाठी पाठविला जात नाही.