सांगलीतील वेरळा विकास संस्थेचे संस्थापक आणि चिंतनशील साहित्यक अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी सुहृदाने व्यक्त केलेल्या भावना...
सांगलीतील वेरळा विकास संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त कळताच धक्का बसला. त्यांचे वय झाले असले, तरी ते प्रकृतीची जाणीवपूर्वक काळजी घ्यायचे. इतकेच नव्हे, तर आपण आणखी काही वर्षे निश्चितच जगणार असल्याचा आत्मविश्वास त्यांना होता. त्यामुळेच त्यांचे असे अचानक जाणे धक्कादायक ठरले.
अरुण चव्हाण यांनी समाजसेवक, साहित्यिक, कृषीहितकारी अशी विविधांगी ओळख आपल्या कामातून निर्माण केली होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, वर्तन व्यवहारातून खानदानी सौंदर्याचा, सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचा, शालिनतेचा प्रत्यय यायचा. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण मोगऱ्यासारखे प्रफुल्लीत करणारे असायचे. हा सुगंध मुठीतून सुटू नये, असे वाटत राहायचे. अरुण चव्हाण यांचे इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व होते. त्यांची इंग्रजी क्विन्स इंग्लिश पॅटर्नमधील अतिशय शैलीदार होती. त्यांच्या लिहिण्या-बोलण्यातून ती व्यक्त होत राहायची.
त्यांची ‘तिमीरभेद’ कादंबरी साहित्यवर्तुळात बरीच प्रसिद्ध आहे. सध्या मराठीत उपलब्ध असली, तरी मुळात इंग्रजीतून लिहिली आहे. ती इंग्रजीतून प्रकाशित करण्यासाठी त्यांचा प्रकाशकांशी पत्रव्यवहार सुरू होता.
महात्मा गांधी यांचे नातू अरुण यांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून गांधी विचार व तत्त्वज्ञानाने ते झपाटून गेले. अलीकडेच त्यांनी इंग्रजीमध्ये ‘कँडल इन दी विंड’ या नावाने अरुण गांधी यांच्यावर सुरेख कविता लिहिली होती. ती मित्रांनाही पाठविली होती. या कवितेत त्यांनी अरुण गांधींचे मोठेपण तर संगितले आहेच, शिवाय गांधी विचाराचे महात्म्यही विशद केले आहे.
अरुण चव्हाण यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले. अरुण कोलटकर त्यांचे वर्गमित्र. कोलटकर इंग्रजी-मराठीतील आधुनिक थोर कवी म्हणून मान्यता पावले होते, शिवाय ‘जेजुरी’ या काव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. अरुण चव्हाण यांच्याकडे त्यांच्या खूप आठवणी होत्या. शेवटपर्यंत त्यांचे मैत्रीबंध अतूट होते. अलीकडेच शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध कार्यक्रम झाले. त्यामध्ये अरुण चव्हाण यांनी कोलटकर यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान प्राचार्य गोकाक हे त्यांचे गुरू होते. त्यांच्याबद्दल चव्हाण यांच्या मनात अतिशय विलक्षण आदर होता. आपल्या वेरळा संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीला त्यावरूनच त्यांनी ‘गोकाक भवन’ असे नाव दिले होते.
चव्हाण यांची ‘तिमीरभेद’ कादंबरी कृष्णपूर संस्थान आणि विक्रमराजे यांच्या जीवनावर आहे. वस्तुत: कृष्णपूर म्हणजे कोल्हापूर संस्थान आणि विक्रमराजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. या संस्थानातील रितीरिवाज, लोकपरंपरा, रांगडी मराठी भाषा, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, संस्थानातील इनामदार, सरदार, त्यांचे वाडे या सर्व गोष्टींचे अतिशय चित्रमय दर्शन त्यामधून होते. राजर्षी शाहू छत्रपतींच्या उदंड कर्तव्याचे दर्शनही घडते. शिवाजी महाराजांचा क्रांतिकारी वारसा नव्या काळाशी सुसंगत करू पाहणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे चित्रण त्यामध्ये आहे. संस्थानकाळात अनेक चळवळी, राजकीय, सामाजिक, घडामोडी झाल्या. नेते उदयाला आले. त्यांचे चित्रणही ‘तिमीरभेद’मध्ये दिसून येते. मराठीतील ही एक अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे.
अरुण चव्हाण यांनी काहीकाळ इंग्रजीचे प्राध्यापक, विद्यापीठांचे प्रशासकीय अधिकारी म्हणून संस्मरणीय काम केले. पण नंतरच्या काळात वेरळा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुष्काळी भागासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. दुष्काळी शेतकऱ्यांसाठी केलेले विकासाभिमुख काम फार महत्त्वाचे आहे. माझे भाग्य असे की, त्यांच्याशी विविध विषयांवर बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचा प्रत्यय येत राहिला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील सखोल चिंतन ऐकायला मिळत राहिले. अनेक ग्रंथांचे संदर्भ मिळत राहिले. काव्य, शास्त्र, विनोद आयुष्यभर लक्षात राहील.
लेखक - प्रा. अविनाश सप्रे, सांगली
(लेखक इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या भारतीय भाषा आणि साहित्य विभागाचे समन्वयक संपादक आहेत.)